Description
लेनिन असे म्हणत असे की एकाएकी सर्व जनता मनाने विकसित होऊन शास्त्रीय समाजवादाच्या पातळीपर्यंत येणार नाही. जनतेच्या मनाचा शास्त्रीय समाजवादापर्यंत होणारा विकास ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया राहील. प्रत्येकाच्या प्रवासाचा आरंभ निराळ्या ठिकाणाहून होईल. प्रत्येकाच्या प्रवासाची गती निराळी राहील. प्रत्येकाच्या विचारातील आवर्त निराळे राहतील. शतकानुशतके काही परंपरांमुळे प्रभावित झालेले मानवी मन क्रमाने विकसित करीत. शास्त्रीय समाजवादाच्या पातळीपर्यंत या मनाचे उन्नयन करणे हे एक कष्टाचे व जिकिरीचे काम आहे. ती जबाबदारी मार्क्सवाद्यांनी पार पाडली पाहिजे. ती पार पाडायची असेल तर चिंतनाच्या सर्व क्षेत्रांत प्रवेश करून, तेथील सिद्धान्तांचे विश्लेषण करून जनतेच्या मनाच्या विकासाला मार्क्सवाद्यांनी हातभार लावला पाहिजे. हे कार्य अतिशय कठीण आहे. देवीप्रसादांनीच आपल्या एका पुस्तकात लेनिनच्या या भूमिकेचा उल्लेख केलेला आहे. देवीप्रसाद आपल्या विवेचनाने हे कार्य पार पाडीत आहेत, असे म्हटले पाहिजे.देवीप्रसादांच्या ग्रंथाची पातळी व दिशा निराळी. प्रा. गाडगीळांनी ज्या पद्धतीने त्यांच्या विवेचनाचा परिचय करून दिलेला आहे. त्याची पातळी व दिशा निराळी. गाडगीळांचा हा प्रयत्न जिज्ञासू मराठी वाचकांना आपल्या पूर्वपरंपरेचा ऐतिहासिक पद्धतीने विचार करण्यास साहाय्यभूत होईल आणि सांस्कृतिक क्षेत्रातील शास्त्रीय समाजवादी चितनाला हा ग्रंथ मोठ्या प्रमाणात साहाय्यभूत होईल अशी खात्री आहे. – नरहर कुरुंदकर (प्रस्तावनेतून)




Reviews
There are no reviews yet.